दिवाळीच्या खरेदीने बाजारपेठेत उत्साहाचे वातावरण
गंगापूर, (प्रतिनिधी): दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर शहरातील बाजारपेठा ग्राहकांनी गजबजून गेल्या आहेत. सकाळपासून रात्रीपर्यंत खरेदीसाठी ग्राहकांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. विशेषतः कापड बाजार, रेडीमेड शोरूम, मोबाईल दुकाने आणि सराफा बाजारात खरेदीचा उत्साह ओसंडून वाहत आहे.
सोन्या चांदीच्या दरांमध्ये मोठी वाढ झाली असली तरीही सराफा बाजारात ग्राहकांची उपस्थिती मोठ्या प्रमाणात होती. ङ्गङ्ख्या वर्षी सोन्याच्या भावात वाढ असूनही गेल्या वर्षाच्या तुलनेत खरेदी अधिक झाली आहे, अशी माहिती सराफ व्यापारी संतोष अंबिलवादे यांनी दिली.
दरम्यान, इलेक्ट्रॉनिक्स, फर्निचर, तसेच गृहउपयोगी वस्तूंच्या दुकानांमध्येही ग्राहकांची चांगली वर्दळ होती. मात्र, रिअल इस्टेट, दुचाकी, ट्रॅक्टर आणि चारचाकी वाहन विक्रीत मागील वर्षाच्या तुलनेत घट झाल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले. दिवाळीच्या आनंदात ग्राहकांनी सजावटीच्या वस्तू, दिवे, फटाके आणि गोडधोड खरेदीतही भर घातली असून, गंगापूर बाजारपेठेत सर्वत्र चैतन्याचे वातावरण निर्माण झाले आहे.